भाजपा खासदाराची केंद्र सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘कोरोनाविरुद्धच्या लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टिका विरोधक करत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतही कोरोनावरून पंतप्रधान मोदीवर प्रचंड टीका होत आहे. अशातच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्राला घरचा आहेर दिला आहे. कोरोना संकटात पंतप्रधान कार्यालय काहीच कामाचे नाही. सध्याची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे. दरम्यान, नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामी म्हणाले, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज आहे. यात गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवले असल्याचे ते म्हणाले.

याबाबत खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. भारत मुघलांचे आक्रमण आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला आहे. तसेच आपण कोरोना महामारीचा सामना करुन नक्कीच टिकून राहू. पण आता आपण योग्य काळजी घेतली नाही, तर मुलांवर परिणाम करणारी आणखी एक लाट येईल. त्यामुळे मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे उपयोगाचे नसल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबद्दलही भाष्य केले आहे. डॉ. हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. परंतू अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल अशी अपेक्षा स्वामीनी व्यक्त केली आहे. दरम्यान भारतात 2 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळणा-या देशाच्या यादीत भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. कोरोना संसर्गाचा वेग इतका आहे की, अवघ्या 17 दिवसांत रुग्णांची संख्या 1 कोटीवरून 2 कोटीवर गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 3 लाख 57 हजार 229 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3 हजार 449 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 3 लाख 20 हजार 289 जण कोरोनापासून बरे झाले आहेत.