नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्रात फोडणार लोकसभा प्रचाराचा नारळ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – लोकसभा निवडणुकीच्या अधिसूचने पूर्वी नरेंद्र मोदींनी विकास कामाच्या उदघाटनाचा आणि भूमी पूजनाचा धडाकाच लागला आहे. १६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी खान्देश आणि विदर्भात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. याच वेळी नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराचा हि नारळ फोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे भाजपने प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी सुरुवात केली आहे. प्रचाराच्या कामात अमित शहा यांच्या सह नरेंद्र मोदी सुद्धा आघाडी घेत असल्याचे चित्र सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात दिसते आहे. सोमवारी अमित शहा यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ४८ जागा लढविण्याच्या तयारीने सज्ज रहा असे म्हणले आहे. त्यामुळे शहा मोदी जोडीने महाराष्ट्राला लोकसभा निवडणुकीसाठी विशेष महत्व दिले आहे.

मनमाड-धुळे-इंदोर या रेल्वे मार्गाचे भूमी पूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे ठरवले आहे. त्यावेळी सुलवाड-जामफळ या २४०० कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनेचे भूमी पूजन मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. याच सभेतून खान्देशच्या प्रचाराचा मोदी शुभारंभ करणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या अधिक असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा येथे महिला बचत गटांना मोदी आर्थिक मदत देण्याच्या कार्यक्रमात हि सामील होणार आहेत.