धक्कादायक ! पीक विम्याच्या बनावट दाव्यांसाठी हवामान यंत्रणेत फेरफार, नगर जिल्ह्यातील घटना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्य सरकारच्या हवामान विमा योजनेचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने बोगस दावे करण्याची घटना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण येथे घडली आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या पाऊस मापनात फेरफार करण्यात आल्याचा प्राथमिक माहिती अहवाल कृषी विभागाने पोलिसात दाखल केला आहे.

हवामान पीक विमा योजनेत केळी व डाळिंब यासारख्या पिकांना विमा दिला जातो. प्रत्येक महसूल परिक्षेत्रात असलेल्या 2092 हवामान केंद्रांतून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे विमा दावे मंजूर केले जातात.
प्रत्येक महसूल परिक्षेत्रात पाच ते दहा गावांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिलेली आहे. या हवामान केंद्रातील माहिती दर दहा मिनिटाला कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत असते. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी महसूल, कृषी अधिकार्‍यांचे पथक नेमण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्या भागात किरकोळ पाऊस झाल्याचे सांगितले.

त्यामुळे पर्जन्यमापकात कुणीतरी पाणी ओतून फेरफार करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यात पर्जन्यमापकात फेरफार करण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली. हवामान केंद्रांच्या सुरक्षेचा मुद्दा कृषी विभागाकडील पीक विमा योजना व महसूल विभागाकडून त्यानुसार दिली जाणारी नुकसान भरपाई यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आकडेवारी संकलित करणार्‍या केंद्रात छेडछाड करण्याचा प्रकार देवदैठण येथे घडल्यानंतर नगर जिल्ह्यातील 97 महसूल मंडळातील हवामान केंद्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.