मोदीजी आता माझेही चॅलेंज स्वीकारा : राहुल गांधी

मुंबई: वृत्तसंस्था

केंद्रिय क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन ‘फिट इंडिया’ मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी स्वत: व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर व्यायाम करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करा, असं आवाहन करत, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विविध सेलिब्रिटींना चॅलेंज दिले.

कोहलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी आणि पत्नी अनुष्का शर्मा यांना नॉमिनेट करत चॅलेंज दिले. कोहलीचे हे चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारल्याचे ट्विट केले. मात्र फिटनेस चॅलेंजवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन मोदींना अनोखं चॅलेंज दिले आहे. या ट्विटमध्ये राहुल म्हणतात, “मोदीजी, तुम्ही विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारल्याचं पाहून आनंद झाला. आता माझंही एक चॅलेंज स्वीकारा. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा, किंवा काँग्रेस देशभरात करत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हा. प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत” असे ट्विट करत राहुल गांधींनी मोदींना चॅलेंज दिलं आहे.

आता या ‘फिट इंडिया’ मोहिमेला देखील राजकिय वळण लागते की काय असे वाटत आहे. राहुल गांधींच्या ट्विट ला मोदींचे काय उत्तर येते हे पाहणे महत्वाचे राहील .