मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली ? दिल्लीत पोस्टरबाजी करणार्‍या 100 जणांना अटक

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – मोदीजी, तुम्ही आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली ? असा सवाल करणारे भित्तीपत्रक दिल्लीत विविध ठिकाणी चिकटवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 100 जणांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व रोजंदारीवरील मजूर अन् बेरोजगार युवक आहेत. यात ई-रिक्षाचालक (30), शाळा सोडलेले तरुण (19), लाकडी चौकटी बनवणाऱ्याचा (61) जणांचा समावेश आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी भित्तीपत्रके दिल्लीत विविध ठिकाणी चिकटवल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस आयुक्त एस. एन.श्रीवास्तव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी 12 मे रोजी 100 जणांना अटक केली होती. पोस्टर्सवर मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया? असा मजकूर लिहला होता. आरोपीना फलकांवरील मजकुराबद्दल किंवा त्यात गुंतलेल्या राजकारणाची त्यांना काहीही कल्पना नव्हती.

अटक झालेला राहुल त्यागी म्हणाला की, आम आदमी पक्षाचे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने मला 20 फलक लावण्यासाठी 600 रुपये देण्याचे कबुल केले होते. मात्र धीरेंद्र कुमार यांनी हा आरोप नाकारला आहे. आपने या आरोपाला उत्तर दिले नाही. परंतु, ट्विटरवर म्हटले की, मोदी जी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया? दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील हे पोस्टर शेअर केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मलादेखील अटक करा. तसेच मोदीजी, आपण आमच्या मुलांच्या लसी विदेशात का पाठविल्या अशी विचारणा केली आहे.