… म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व लडाखजवळील सीमेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसाचार झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात भारतात संतापाची लाट उसळली, त्याच अनुषंगाने मोदी सरकारनं ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली. यावरुन आता शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच टीका करत असताना शिवसेनेने मोदींच कौतुक देखील केलं आहे. चीनच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत आपल्यात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेन. चिनी ऍप्सवर बंदी घातल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी हिंदुस्थानी जनतेच्या हिताचे रक्षण होईल, असं सुद्धा सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सरकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे

या चिनी ऍप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे सरकारला नेमके कधी समजले? राष्ट्रीय सुरक्षेला धोका होताच मग इतकी वर्षे हे सर्व ऍप्स व त्यांचे व्यवहार आपल्या देशात बिनबोभाट कसे सुरु होते? म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्षच केले, असा आरोप विरोधकांनी केले तर त्यावरती सरकारची भूमिका काय असेल? हे जे चिनी ऍप्स आहेत त्यामुळे देशाची माहिती बाहेर जाते असे सरकारने आता सांगितले. हे खरे असेल तर इतकी वर्षे हे ऍप्स चालू देणाऱ्या सर्वच सरकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे लागेल, असं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं.

चिनी टिकटॉक स्टार्स चे काय होणार?

अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर प्रचलित असलेल्या या ऍपकडून आपल्याकडील ‘युजर्स’ ची माहिती बेकायदा साठवून हिंदुस्तान बाहेरील सर्व्हसना पुरवली जात असल्याच्या तक्रारी होत्याच. टिकटॉकसारखे चिनी ऍप अश्लीलता व इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते व त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही ‘टिकटॉक’ स्टार्सनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारण शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार हा प्रश्नच आहे, असा टोलाही सामनामधून भाजपाला लगावण्यात आला आहे.

झाले गेले गंगेला मिळाले

लडाख संघर्षांनंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला जी डिजिटल जाग आली आहे ती जग कायम राहावी. चीनच्या प्रत्येक कंपनीला स्वतःकडे उपलब्ध असलेला डेटा चीन सरकारला उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. चिनी गप्तचर यंत्रणा आणि चिनी लष्कर या ‘डेटा’ चा वापर हिंदुस्थानविरोधात करू शकते, असे आता आपल्या गुप्तचर यंत्रणांनी सरकारला कळविले. म्हणजे आतापर्यंत देशाची गोपनीय माहिती चिन्यांकडे गेलीच आहे. आता झाले गेले गंगेला मिळाले. सरकारला आता जाग आली. त्यामागे जनतेचा रेटा आहे. त्यातूनच चिनी ऍप्सवर बंदी आणली. सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला डिजिटल पद्धतीने घेतला आहे.

आमच्या २० जवानांना बलिदान द्यावे लागले

हिंदुस्थान सरकारने ‘ऑनलाइन’ कंपन्या बंद केल्यामुळे चीनने नाराजी व्यक्त केली आहे, पण फक्त नाराजी व्यक्त करून काय फायदा? गलवान खोर्‍यात आजही चिनी सैन्य आहे व ते मागे हटायला तयार नाही. कोणी किती मागे हटायचे यावर दोन्ही देशांच्या सैन्य कमांडरांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याच वेळी चीनच्या ५९ ऍपवर मोदी सरकारने बंदीहुकूम बजावला. चीनच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याची हिंमत आपल्यात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट वापरणार्‍या कोट्यवधी हिंदुस्थानी जनतेच्या हिताचे रक्षण होईल. आपल्या देशातील माहितीचे भांडार बाहेर जात होते याचा साक्षात्कार आमच्या राज्यकर्त्यांना आता झाला व त्यासाठी लडाखच्या सीमेवर आमच्या 20 जवानांना बलिदान द्यावे लागले, अशी भावना देखील सामानातून व्यक्त केली आहे.