राममंदिरासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न वाखाणण्यासारखे : राज ठाकरे

पोलिसनामा ऑनलाईन – राममंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांनी पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहे.

जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचे बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, असेही राज ठाकरे म्हणाले. स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. अयोध्येत उभे राहणारे राममंदिर हे नेहमीचे मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतके हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचे, अगतिकतेचे, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचे, सहनशीलतेचे आणि म्हणूनच ह्या क्षणाचे महत्व वेगळे असल्याचे म्हटले आहे.