पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात ‘या’ खेळाडूची वापसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वचषकाची तयारी सर्वच संघानी जोरात सुरु केलेली आहे. सर्वच संघानी आपल्या खेळाडूंची घोषणा देखील केली आहे. पाकिस्तानने देखील आपल्या संघाची घोषणा केली होती. मात्र या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या वर्ल्ड कप संघात डावखुरा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरचा समावेश केला आहे.

पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत असून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सध्या पाकिस्तान २-० ने पिछाडीवर असून सगळ्याच स्तरावर चांगले प्रदर्शन करण्यासाठी झगडत आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या गोलंदाजीच्या इंग्लंडचे फलंदाज चिंधड्या उडवताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा या संघात समावेश करण्यात आल्याचे समजते. मोहम्मद अमीर देखील आपल्या फॉर्मशी झगडत आहे मात्र इंग्लंडमधील पाकिस्तानची परिस्थिती पाहून त्याला संधी दिल्याचे समजते. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला विश्वकप संघात देखील घेण्यात आले नव्हते. मात्र आता त्याचा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेबरोबरच विश्वकप संघात देखील समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, मोहम्मद अमीर याला कांजण्या झाल्या असल्यामुळे तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. मात्र आमीर वेळेत बरा होईल, अशी आशा कर्णधार सर्फराज तसेच पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना आहे.