मोहम्मद शमी 6 आठवडे क्रिकेटपासून दूर, ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  भारतीय क्रिकेट संघासाठी ही अॅडलेड कसोटी फारच निराशाजनक ठरली आहे. सर्वात कमी धावसंख्या ( ९ बाद ३६) कसोटी म्हणून क्रिकेटच्या इतिहासातील भारताच्या नावावर नोंदवली गेली. याच सामन्यात ११व्या क्रमांकावर फलंदाजीला मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आहे. याच्या हातावर पॅट कमिन्सनं टाकलेला चेंडू जोरात आदळला. आता त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी जावे लागले. परिणामी, ९ बाद ३६ धावांवर भारताला खेळ थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियासमोर ९० धावांचे माफक लक्ष्य राहिले. ते त्यांनी दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी मोहम्मद शमीची ती दुखापत धक्कादायक आहे.

दरम्यान,अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी विराटनं सुट्टी मागितली होती आणि ती BCCIनं मान्य केली आहे. तर दुसरीकडे शमीला दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. विराट कोहली ( Virat Kohli) माघारी परतला असल्यानं टीम इंडिया अडचणीत आहे. विराट मंगळवारी मायदेशी परतला आणि शमी बुधवारी भारतात परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमी सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यालाही तो असणार नाही. दरम्यान, अॅडलेड कसोटीत शमीला एकही विकेट घेता आली नाही. तर शमी जागी मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यांचे नाव चर्चेत आहेत. दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे.

BCCIच्या सूत्रांनी PTIला सांगितलं की, ”शमीला पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवडे लागतील आणि त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. हातावरील प्लास्टर काढल्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल.” ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा पाहुणचार करणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यावर चार कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

असं आहे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी – चेन्नई
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद
टी-२० (सर्व सामने अहमदाबाद)
१) १२ मार्च पहिला टी-२०
२) १४ मार्च दुसरा टी-२०
३) १६ मार्च तिसरा टी-२०
४) १८ मार्च चौथा टी-२०
५) २० मार्च पाचवा टी-२०

वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे