‘मी माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आधार गमावला’, वडिलांच्या निधनानंतर क्रिकेटर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोहम्मद सिराजचे वडील, 53 वर्षीय मोहम्मद गौस यांचे शुक्रवारी हैदराबादमध्ये फुफ्फुसांच्या आजारामुळे निधन झाले. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिराज सध्या टीम इंडियासह आगामी ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे आहे. 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.

स्पोर्टस्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार ही बातमी ऑस्ट्रेलियामध्ये सिराजपर्यंत पोहाेचली. सिडनी येथे सराव सत्र संपल्यानंतर त्याला दुःखद बातमी कळली. ही बातमी ऐकल्यानंतर सिराज म्हणाला की, त्याचे वडील त्याच्या जीवनातील सर्वांत मोठे आधार होते.

“मी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी माझ्या वडिलांची नेहमीच इच्छा होती. आणि हे निश्चित करण्यासाठी मी हे नक्की करीन,” असे खेळाडूने स्पोर्ट स्टारला सांगितले.

“हे धक्कादायक आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आधार गमावला. त्यांनी मला सांगितले होते की, मला देशासाठी खेळताना पाहणे हे त्यांचे सर्वांत मोठे स्वप्न होते आणि मला आनंद झाला की मला ते अनुभवता आले आणि तो आनंद त्यांना देता आला,” असे त्याने वेबसाइटला सांगितले.

अंत्यसंस्कारासाठी भारतात परत येणे खूप अवघड आहे –
सिडनीमध्ये कठोर कोविड 19 क्वाॅरंटाइन नियम कडक असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी खेळाडूला भारतात परत येणे खूप अवघड आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2020 मध्ये तो आरसीबीच्या फ्रँचायझीचा भाग होता. अबुधाबीमध्ये केकेआरच्या विरोधात त्याची विक्रमी कामगिरी झाली. त्यानंतर सिराजने आपल्या वडिलांची तब्येत खूपच खराब असल्याचे सांगितले होते.

आयपीएलमध्येच तब्येत खूपच खराब होती –
“आजकाल माझे वडील अस्वस्थ आहेत. त्यांचे फुफ्फुस खराब आहेत, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मला याची खरोखरच चिंता आहे. मी घरी जाऊन त्यांना भेटू शकत नाही. मी फोनवर बोलत असतो, पण जेव्हा मी फोन केला तेव्हा ते रडण्यास सुरुवात करतात. मी जास्त वेळ बोलू शकत नाही कारण त्यांना रडताना मी पाहू शकत नाही. म्हणूनच, मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी देवाला प्रार्थना करतो. शेवटच्या खेळापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केकेआर खेळानंतर आरसीबीने पोस्ट केलेल्या व्हिडिओत सिराज म्हणाला की, बाबा रुग्णालयात होते याची मला खरोखर काळजी होती.”

वेगवान गोलंदाज आयपीएल 2020 मध्ये आरसीबीकडून 9 डावांमध्ये खेळला आणि 11 गडी बाद केले. केकेआरविरुद्ध त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.