खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण : फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले – .’.. तर एवढ्यात भाजप नेत्यांची नावे जाहीर केले असते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत काही भाजप नेत्यांची नावे असल्याचा दावा केला जात आहे. त्याची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, आत्महत्या कुणाचीही असो त्याची चौकशी झालीच पाहिजे. डेलकरांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी सुसाईड नोट सापडली आहे. कुणी काहीही आरोप करत असले तरी या नोटमध्ये कुठल्याही भाजपाच्या नेत्याचे नाव नाही, असे मी दाव्यानिशी सांगू शकतो. जर त्या नोटमध्ये भाजपाच्या नेत्याच नाव असते तर ते एवढ्यात जाहीर केल असते, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूनही फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीस म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. सगळे पुरावे असताना धडधडीत खोट बोलावे लागते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या क्लीप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडल ते खर की खोटं याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे आव्हानही फडणवीसांनी दिले आहे. तसेच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर ठरवा. मात्र तुमच्या नैतिकतेच काय असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.