महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची उचलबांगडी

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन 

अखिल भारतीय काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाची प्रक्रिया अद्यापही चालू असून महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची उचलबांगडी करण्यात आली आहे त्यांच्या जागी काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोनल पटेल, आशीष दुआ आणि संपत कुमार या तीन सचिवांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्यानंतर संघटनेत बदल करण्यात येत आहेत. अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी बदलण्यात आले. महाराष्ट्रातही प्रभारी बदलण्यात येतील अशी चर्चा महिन्याभरापासून होतीच. पंचाहत्तर वर्षीय खर्गे यांच्याकडे प्रभारीपदाची सूत्रे सोपवताना त्यांना तीन सहकारी देण्यात आले आहेत. प्रभारी बदलल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे भवितव्य काय? या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पाच वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील प्रभारीपद मोहन प्रकाश यांच्याकडे होते. मात्र, २०१४ पासून महाराष्ट्रात काँग्रेसची घसरगुंडी होत राहिली. अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेस सोडून गेले. ब्लॉक कमिट्या नेमण्यात अपयश आलेले आहे. संघटनात्मक बाबीत अनेक तक्रारी राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आल्या त्याची दखल घेऊन आगामी लोकसभा ताकदीने लढवण्याचा संदेश नव्या नियुक्त्यांमधून देण्यात आला असून त्यादृष्टीनं एक प्रभारी आणि तीन सहप्रभारी अशी, नियुक्ती प्रथमच करण्यात आली आहे.