मोहिते पाटलांनी दिला होता जेव्हा इंदिरा गांधींनाही धक्का..!

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात 1972 मध्ये दुष्काळ पडला होता. अशातही सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाचं लग्न जोरदार पद्धतीने केलं. उन्हाळ्याचे दिवस असतानाही लोकांना सरबत देण्यात आले . चक्क विहिरीत साखरेची पोती आणि बर्फाच्या लाद्या घालण्यात आल्या. जवळपास लाखभर लोक त्यांनी जेवायला घातली. त्यांनी दिलेल्या या लक्षभोजनाची चर्चा देशपातळीवर झाली आणि राजकारणात तर अजूनही होताना दिसते. त्या घटनेनंतर अकलुजचे मोहिते पाटील प्रकाश झोतात आले. आणि ज्या मुलाच्या लग्नात हे सगळं घडलं तो मुलगा म्हणजे आजचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील.

त्याच दरम्यान झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शंकरराव मोहिते यांचं विधानसभेचं तिकीट कापलं. त्यांचं तिकीट कापणं म्हणजे शंकररावांना मोठा अपमान वाटला. यानंतर शंकररावांनी धमक दाखवली आणि त्यांनी बाबुराव देशमुख यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं करून निवडुनही आणलं. त्या काळात ही धमक दाखवणं सोपं काम नव्हतं. शंकररावांनी जी धमक दाखवली त्यामुळे राजकारणात इतिहास घडला. त्यामुळे महिते पाटील घराण्याला बंडखोरी नवी नाही. हा बंडाचा गुण आता तिसऱ्या पिढीतही उतरला आहे.

आणि शंकरराव मोहिते पाटील हे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी झाले

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस एकेकाळी ओसाड परिसर होता. या ओसाड माळरानावर शंकरराव मोहिते पाटील यांनी नंदनवन फुलवलं. शंकरराव मोहिते यांनी शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था यांचं जाळंच विणलं. त्यांनी अकलूजमध्ये माळेवाडीचं कॉलेज, यशवंत नगरची महर्षी प्रशाला, सदाशिवराव माने विद्यालय सुरु केले. इतकेच नाही तर, शिवामृत दूध संघ, राजहंस कुक्कुटपालन, शंकर सहकारी साखर कारखाना, सूत गिरणी अशा असंख्य संस्था त्यांनी उभारल्या. फक्त उभारल्याच नाहीत तर त्या यशस्वी करूनही दाखवल्या. यानंतर अकलूज सहकाराची पंढरी आणि शंकरराव मोहिते पाटील हे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी झाले.