Pimpri News : सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया टोळीवर मोका अंतर्गत कारवाई

निगडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, बलात्कार, अपहरण, वाहनांची तोडफोड यासारखे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया याच्यासह 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी टोळी प्रमुख व पाहिजे असलेला आरोपी रोहन राजू राजू चंदेलिया उर्फ चंडालिया (वय-20 रा. जाधव वस्ती, रावेत), विजय उर्फ गुंड्या निळकंठ शिंदे (वय-28 रा. ओटास्किम, निगडी), प्रदिप महादेव जगदाळे (वय-19), विशाल विक्रम सोळसे (वय-19), निलेश उर्फ निलु देवीदास कांबळे (वय-22 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), यश उर्फ रघु अतुल कदम (वय-19), किरण शिवाजी खवळे (वय-20), नंदकिशोर उर्फ मनोज उर्फ मन्या शेषराव हाडे (वय-25 रा. चिखली) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राजू राजू चंदेलिया उर्फ चंडालिया आणि इतर आरोपी हे वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून वैयक्तीतरित्या अथवा संघटितपणे दरोडा टाकणे, शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, बलात्कार, शस्त्र बाळगणे, वाहनांची तोडफोड करणे असे एकूण 30 गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात दाखल आहेत. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस नाईक संदिप दानवे, निलेश चासकर, निगडी पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली.