मोक्का गुन्ह्यातील आरोपीला पिस्टलसह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्का गुन्ह्यातील आरोपीला पिस्टलसह पुणे गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गाजवळील सार्वजनिक रोडवर करण्यात आली. त्याच्याकडून गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन काडतुसे असा एकूण ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशाल सज्जन फाळके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोक्का गुन्ह्यातील आरोपी विशाल फाळके हा पुणे-बेंगलोर महामार्गाजवळील सार्वजनीक रोडवर थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून विशाल फाळके याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली.

अंगझडतीमध्ये त्याच्यकडे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. आरोपी फाळके याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक राजकुमार केंद्रे, संजय गायकवाड, किरण अडागळे, पोलीस हवालदार संतोष क्षीरसगार, पोलीस नाईक सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने केली.