पत्रकार बाळ बोठे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात नगर शहरातील एका विवाहित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पत्रकार बाळ ज. बोठे हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर खूनासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे बोठे याच्या अडचणीत आता भर पडली आहे. बोठे याने राहत्या घरी येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत सदर महिलेने म्हटलं आहे.

३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे मात्र फरार असून गेल्या २५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना गेल्या अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले असल्याचे समजते.

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात शेळके याच्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान पोलीस २० ते २२ दिवसांपासून फरार बोठे याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, बोठे हा पुणे येथे शेळके याच्याकडे लपला असल्याच्या संशयावरून पोलीस उपाधीक्षक अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला़ यावेळी शेळके सापडला मात्र बोठे याने पुन्हा गुंगारा दिला. रेखा जरे हत्याकांडात चौकशी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा शेळके याला अटक करू शकते.