अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला 15 हजाराचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. विशेष न्यायाधीश ए. डी. पिंपरकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी (दि. 5) हा निकाल दिला आहे. ही घटना 2016 मध्ये घडली होती.

रघुनाथ आनंदा नवघरे (वय 53 रा. कौलखेड चौक, न्यू खेताननगर ) असे शिक्षा सुनावलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, बार्शिटाकळी तालुक्यात श्री संत तुकडोजी महाराज आश्रमशाळा असून या शाळेत आरोपी हा शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने शाळेत चौथीच्या वर्गात शिकणा-एका अल्पवयीन मुलीचा 9 जानेवारी 2016 रोजी विनयभंग केला होता. त्यानंतर मुलगी व तिच्या आईने या प्रकरणाची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. मुख्याध्यापकांनी चौकशीनंतर मुलीच्या आईला पोलिसात तक्रार देण्यास सांगितले होते. त्यावरून बार्शिटाकळी पोलीसात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करून शिक्षक नवघरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वैशाली गणवीर यांनी करून दोषारोपपत्र पोस्कोच्या विशेष न्यायालयात दाखल केले. त्यानंतर न्यायाधीश ए.डी. पिंपरकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीस पोस्को कायद्याच्या कलमान्वये दोषी ठरवीत 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणांमध्ये मुख्याध्यापक व तपास अधिकारी वैशाली गणवीर यांची साक्ष महत्त्वाची ठरली, तर फिर्यादी मुलगी व तिची आई न्यायालयासमोर फितूर झाले. त्यामुळे न्यायालयाने मुलीच्या आईवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.