आधी महिलेच्या मांडीवर बसला, उठण्यास सांगितल्यावर शिवीगाळ करून बोटाचा चावा घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पीएमपी बसने प्रवास करताना एक ६६ वर्षीय व्यक्ती महिलेच्या मांडीवर येऊन बसला. महिलेने उठण्यास सांगितल्यावर तो बाजूला बसला खरा, परंतु पुन्हा तिच्या मांडीला मांडी लावून बसल्याने महिलेने मी उठते नाही तर तुम्ही उठा म्हटल्यावर मात्र तिला अश्लील शिवीगाळ करत तिच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. हा प्रकार मंगळवारी दुपारी पीएमपी बसमध्ये शिवाजीनगर ते पोस्ट ऑफिस दरम्यानच्या प्रवासात घडला.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शाम निवृत्ती वांजळे (वय ६६, रा. वारजेनाका) यांना अटक केली आहे. तर याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शिवाजीनगर ते पोस्ट ऑफिसदरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी बसमध्ये शाम वांजळे चढले. ते फिर्यादी महिलेच्या मांडीवर बसले. त्यानंतर महिलेने तुम्ही माझ्या मांडीवर बसले आहात. उठा मांडीवरून म्हटल्यावर ते उठले. त्यानंतर ते उजव्या बाजूला सरकून बसले. तेव्हा ते फिर्यादी महिलेच्या मांडीला मांडी घासून विनयभंग केला. त्यावेळी महिलेने त्यांना तुम्ही उठा नाहीतर मी उठून जाते असं म्हटल्यानंतर त्यांनी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यासोबत त्यांच्या थोबाडीत मारून हाताच्या बोटाचा चावा घेतला. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.