धक्कदायक…! वसतिगृहातील मुलींचा विनयभंग, ‘तो’ रात्री फिरायचा विचित्र अवस्थेत 

सांगली : प्रतिनिधी – सांगली शहरातील कर्नाळ रास्ता येथे असलेल्या पसायदान मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातील गाडीचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एका मुलीच्या तक्रारीवरून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार अंगडी यांच्यासह मुख्याध्यापक ,चालक आणि स्वयंपाकिणीला देखील अटक करण्यात आली आहे. तर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग,बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
सांगली येथील कर्नाळ रस्त्यालगत मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात २३ मुली राहतात. पहिली ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुली आहेत संजय किणीकर व त्याची पत्नी वर्षाराणी  तेथे देखरेखीस आहेत. करांडे हा तेथे मुख्याध्यापक आहे. संजय किणीकर संस्थेच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. ज्या खोलीत या मुली झोपतात त्या खोलीच्या दरवाज्याला कडी नाही. त्यामुळे या मुली दरवाजा पुढे ढकलून झोपतात. तर संस्थेचा चालक संजय आणि त्याची पत्नी वर्षाराणी हे दोघे देखील वस्तिगृतच एका खोलीत राहतात. वर्षाराणी ही त्या वस्तिगृहात स्वयंपाकीण म्हणून काम करते. रात्रीच्या वेळी संजय किणीकर हा तेथे अर्धनग्न अवस्थेतच फिरत असतो.

तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही, खरे सांग
एके दिवशी रात्री पीडित मुलीकडे हा संजय एकटक नजरेने पाहता थांबला होता. पीडित मुलीने हा सर्व प्रकार खोलीतील इतर मुलींना सांगितला. नोव्हेंबर 2018 मध्ये रात्री 9 वाजता जेवण करुन मुली झोपल्या होत्या. त्यावेळी किणीकर हा मुलींच्या खोलीत गेला. त्याने पीडित मुलीला दम देऊन  ‘तू माझ्यावर प्रेम  करतेस की नाही, खरे सांग’  असे म्हणाला व तिचा विनयभंग केला. पीडितेने त्याच्यापासून सुटका करुन घेतली व ती खोलीत जाऊन झोपली. पीडितेने दुसर्‍या दिवशी हा प्रकार इतर मुलींना सांगितला. यावेळी इतर मुलींनीही किणीकर याने आमच्याशीही असाच प्रकार केला असे सांगितले. विशेष बाब म्हणजे स्वयंपाकीण वर्षाराणी हिला या घटनेबाबत मुलींनी माहिती दिली होती मात्र मुलींना मदत करण्या ऐवजी तिने ‘तुम्ही माझ्या पतीचे नाव घ्यायचे नाही, नाही तर तुमच्या झिंज्या उपटून टाकेन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे मुली गप्प बसल्या.

त्यानंतर धाडस करून पीडित मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे.  याप्रकरणी चालक संजय किणीकर याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अन्य तीन संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नंदकुमार ईश्‍वराप्पा अंगडी (वय 57, रा. पेठभाग, गवळी गल्ली, सांगली), मुख्याध्यापक आप्पासाहेब महावीर करांडे (वय 42, रा. यशवंतनगर), वाहनचालक संजय अरुण किणीकर (वय 36) व त्याची पत्नी ( स्वयंपाकीण) वर्षाराणी संजय किणीकर (वय 2८दोघेही रा. पसायदान शाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान पसायदान संस्थेचा संस्थापक नंदकुमार अंगडी यांनी सांगली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील शालेय पोषण आहार पुरवठ्याचा ठेका त्याने घेतला होता.काही दिवसांपूर्वी पीडित मुलींचे पालक मुलींना भेटायला आले होते. त्यावेळी मुलींनी किणीकर याच्याकडून अत्याचार होत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी मुलीच्या पालकांसह अन्य मुलींच्या पालक शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांना सर्व घटना सांगितल्यानंतर सोमवारी मध्यरात्री चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना तातडीने अटक करण्यात आली.

मुलींना नापास करण्याची धमकी
संजय किणीकर याचा त्रास वाढत चालल्याने पीडित मुलींनी संस्थापक अंगडी, मुख्याध्यापक  करांडे यांच्याकडे त्याच्याबद्दल तक्रार केली होती. त्याने केलेल्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचला होता. मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेतलीच नाही. शिवाय मुलींना हा प्रकार कोठे सांगितला तर नापास करण्याची धमकीच दिली. त्यामुळे मुली गप्प राहिल्या होत्या असे मुलींनी तक्रारीत म्हटले आहे.