पुण्यात ओला कॅब चालकाकडून महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाणेरहून कोथरुड येथे घेऊन जाताना महिलेच्या मांडीस तसेच अंगास वारंवार स्पर्श करुन तिचा विनयभंग करणाऱ्या ओला कंपनीच्या चालकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

राजेश सौरव बाराते (वय २०, रा. मारुती मंदिराजवळ, रावेत गावढाण) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार मुंबई -बंगलुरु महामार्गावरील सुस खिंड ते ऑक्सफर्ड रोड दरम्यान गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी या महिलेने फिर्याद दिली आहे.

ही महिला आपल्या कुत्र्याला बाणेर येथून कोथरुड येथील जनावरांचे दवाखान्यात घेऊन जाणार होत्या. त्यासाठी त्यांनी ओला कॅब बुक केली. राजेश बाराते हा त्यांच्या बाणेर येथील घरी दुपारी एक वाजता आला. ही महिला कुत्र्याला घेऊन कॅबमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसल्या. यावेळी गाडीचा गेअर बदलण्याच्या बहाण्याने राजेश हा त्यांच्या मांडीला सतत स्पर्श करीत होता. तसेच त्यांच्या पाळीव कुत्र्यावरुन हात फिरविण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगास व हातास हाताने स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. त्यामुळे या महिलेने तातडीने पोलिसांना ही बाब कळविली. हिंजवडी पोलिसांनी तातडीने राजेश बाराते याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.