उपचारासाठी आलेल्या मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – वर्धा जिल्ह्यातील पुलगाव ग्रामिण रुग्णालयात मैत्रिणीसोबत आलेल्या मुलीसोबत रुग्णालयातीलच एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित मुलीला मानसिक धक्का बसला. घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली. मात्र मुलगी काहीच सांगत नसल्याने अखेर चाइल्ड हेल्पलाइनची मदत घेण्यात आली.

चाइल्ड हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी  पुलगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध रविवारी (दि.२३) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीची आणि पीडित मुलीची ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने १७ डिसेंबर रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले.

गुंजखेडा येथील अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत आली होती. डॉक्‍टरांनी तिला दाखल करून घेतले. यावेळी पीडिता तिच्यासोबत थांबली. दरम्यान, तिची ओळख याच रुग्णालयात असलेल्या एका युवकासोबत झाली. या युवकाने ओळखीचा लाभ घेत तिच्यावर बळजबरी केली. यानंतर दुसऱ्या दिवशी सदर युवक गुंजखेडा येथे गेला असता त्याला सदर मुलगी दिसली. येथेही त्याने तिच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत बळजबरी केली.

झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या आईने चाइल्ड हेल्पलाइनला दिली. मात्र, पीडित मुलगी काहीच सांगत नव्हती. अखेर शुक्रवारी सकाळी तिने घटनेची माहिती दिल्यानंतर पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सय्यद, शिपाई सागर गिरी करीत आहेत.