जानकर मुख्यमंत्र्यांसमोर नरमले ; राग, थयथयाट झाला शांत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने महराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी न देता रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला बारामतीतून उमेदवारी देण्यात आली. त्यावर जानकरांनी पुण्यातील मेळाव्यात माध्यमांसमोर राग व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना इशाराही दिला होता. पण, अवघ्या काही तासातच जानकरांचा राग शांत झाल्याचे दिसत आहे.

सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय भाजपाने घेतला आहे. सर्व घटकपक्षांच्या युतीची बैठक पार पडली त्यात त्यांनी हा निर्णय घेतला. तसंच सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महादेव जानकर, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे, उद्या कोल्हापूरमधून शक्तीप्रदर्शन करत युतीच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. या सभेला युतीचे सर्व मित्रपक्ष उपस्थित राहणार आहेत.

मित्रपक्षांची भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी पत्रकारांना दिली आहे. सध्या नाही, पण आगामी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसंच घटकपक्षांवर अन्याय होणार नाही, योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल, असं जानकर यांनी सांगितलं.

तसंच, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आजपासून भाजपत असतील आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्या प्रचाराला जाणारच, असे जानकर यांनी स्पष्ट केले. जानकरांच्या या वक्तव्यामुळे जानकरांनी केलेले बंड हे तात्पूरते होते हे स्पष्ट दिसून येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like