पुण्यात ‘कोरोना’चा वाढता धोका, सोमवारपासून PMPML प्रवाशांसाठी नवे नियम, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बस आसन क्षमते इतकेच प्रवासी सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (दि.22) होणार आहे. यामुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने विविध उपायांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पीएमपीला प्रवासी संख्येवर नियंत्रण आणण्यास सांगितले होते.

यानंतर शनिवारपासून प्रवासी संख्येवर नियंत्रण आणण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोमवारपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितल्याने प्रवाशांना बसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. बसची सरासरी आसन क्षमता 32-34 एवढी असल्याने तेवढेच प्रवासी बसमध्ये घ्यावेत अशा सूचना वाहक-चालकांना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय बसमध्ये कोणत्याही प्रवाशाला मास्क शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बसमधील सॅनिटायझरच्या बाटल्या सुस्थितीत असतील याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बसमधील प्रवाशांची गर्दी कमी होणार असल्याने प्रशासनाने सोमवारपासून प्रमुख मार्गावर 50 बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास आणखी 20 बस वाढवणार असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुण्यातील पीएमपी बस सेवा 27 मार्च रोजी बंद करण्यात आली होती. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल सात महिन्यानंतर ठराविक मार्गावर बसेस सुरु करण्यात आली. त्यानंतर सर्व मार्गावर बसेस सुरु करण्यात आल्या. पीएमपीची सेवा सुरळीत होत असतानाच पुण्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीएमपीवर पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार बसेसमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. बसमध्ये आसन क्षमते इतक्याच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे जादा बस सोडाव्या लागणार असून तशी तयारी सुरु करण्यात आली आहे.