तर देशात करोडपती उद्योजकांचे किंवा माफियांचे राज्य असते : रविकांत तुपकर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – या देशात केवळ पैसा किंवा दादागिरीने सत्ता मिळवता येत नाही. आणि जर असे असते तर या देशात करोडपती उद्योजकांचे किंवा माफियांचे राज्य असते. असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान ३० मार्च रोजी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील नेत्यांतर्फे मेहकर तालुक्यात प्रचार दौरा आणि जानेफळ येथे सभा झाली त्यावेळी, भाजपा सरकारने दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीचा शब्द दिला होता; परंतू त्यांनी तो शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही. याउलट आघाडीने शेतकरी हिताचे निर्णय घेण्याबाब आश्वासन दिल्याने स्वाभिमानी आघाडी सोबत आहे. डॉ. शिंगणेंनी स्वत: कोणतीही संस्था, शाळा न घेता कार्यकर्त्यांना दिल्या. कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरोधातील उमेदवाराने मात्र सगळ्या संस्थांची पदे आपल्याच घरात ठेवली आहेत. असा आरोपही त्यांनी केला.

याचबरोबर, स्व. दिलीपराव रहाटे यांच्यासह स्व. किशोरबापू देशमुख, स्व. बंडू पाटील मापारी, स्व. दामूअण लोढे या जुन्या शिवसैनिकांच्या भरवश्यावर नेते झाले आणि आता त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडले. या शिवसैनिकांच्या वारसांना त्यांनी काय दिले. असा प्रश्नी त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर, केवळ पैसे किंवा दादागिरीने सत्ता मिळवता येत नाही. असे असते तर या देशात करोडपती उद्योजकांचे किंवा माफीयांचेच राज्य असते. कोणी केवळ पैसे किंवा दादागिरीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना सर्वसामान्यांनी लोकशाहीची ताकद दाखविली पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने आता बुलडाण्यात परिवर्तनाची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.