कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे

साकोली : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वत्र माणुसकी लोप पावल्याची चर्चा होत असताना साकोली, भंडारा येथील नवजीवन कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी दाखविलेला माणुसकीचा गहीवर पाहून सर्वच भारावून गेले. कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीच्या वैद्यकीय उपचारासाठी या चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळा केले. थोडीथोडकी नव्हे, तब्बल ११ हजार ६०० रुपयांची मदत करण्यात आली.

साकोली येथील फार्मसी महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. मात्र घरची परिस्थिती साधारण असल्याने तिच्या या आजारावर नियमित खर्च करणे परिवाराला शक्य होत नाही. हा प्रकार नवजीवन कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून कळला. माणुसकीच्या नात्याने विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळा करण्याचे धाडस केले. एकाएका विद्याथ्र्याने थोडेथोडे पैसे गोळा करीत ११ हजार ६०० रुपयांची मदत उभारली. प्राचार्य मुजम्मील सय्यद व उपप्राचार्य पांडुरंग राऊत यांच्या सहकार्याने गौपाले यांच्या उपस्थितीत रासेयोचे समन्वयक निंबेकर यांच्या स्वाधीन रक्कम केली. त्यांनी ती रक्कम कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीस दिली. सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्यास अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठीही सर्वजण धावून जातात. संस्कारक्षम वयात चांगले संस्कार झाले की आदर्श नागरिक व्हायला वेळ लागत नाही. याचाच प्रत्यय नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये आला.

या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकांनी कौतुकाची थाप दिली. या उपक्रमासाठी शर्मिला कच्छवाह, भारती व्यास, सतीष गोटेफोडे, चंद्रकांत भावे, लीना लांजेवार, ममता अंबुले, छबू समरीत, हेमलता कुमार, वंदना घोडीचोर, प्रीती बिसने, अर्चना वाईकर, सोनी शहारे, नेहा गभणे, लता कटरे, विशाखा पशिने, कुमेरचंद घोडीचोर, राजेंद्र मेश्राम, दीपा येळे, अमर आरसोडे, विजया परशुरामकर, धम्मदीप खोब्रागडे, जोशीराम बिसेन, ज्योत्स्ना भांडे, प्रीती हर्षे, सोनाली चौधरी, राशी गुप्ता, झामसिंग येळे, एकनाथ काळसर्पे यांनी सहकार्य केले.