आ. प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ ! ED ला सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लाँड्रिंगप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने टाकलेल्या धाडीत सरनाईक यांच्या पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले आहे.

दोन दिवसांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक यांची चौकशी केली होती. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा मारला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळले होते. या क्रेडिट कार्डवर आमदार प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.

पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड फेयरमॉन्ट बँक, कॅलिफोर्निया येथून दिले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती आणि स्टेटमेंटची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केलीय. तसेच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितलीय.

24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता.

दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलगा विहंग याला चौकशीला बोलावले होते. पण, परदेशातून आल्यामुळे सरनाईक कुटुंबीय क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, 10 डिसेंबर रोजी प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग 5 तास चौकशी केली होती. ’आता पुन्हा ईडीच्या चौकशीला यावं लागणार नाही. जर काही प्रश्न असतील तर जेव्हा बोलावण्यात येईल. त्यावेळी मी तात्काळ 2 तासात हजर होईल. तसेच माझ्या कुटुंबीयांतील कुणालाही आता चौकशीला बोलवण्याची गरज नाही. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न-उत्तरे झाली. घोटाळा करणार्‍यांना कडक शासन झालं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली होती.