‘कोरोना’नं शिकवली ‘इमानदारी’ ! रस्त्यावर पडलेल्या 500 अन् 50 च्या नोटांकडे कोणी ढुंकून देखील बघना

रामगड/झारखंड : वृत्तसंस्था – देशात कोरनाचा फैलाव वेगाने वाढत असून नागरिकांनी याचा धसका घेतला आहे. ऐरवी रस्त्यावर एक रुपयाचे नाणे देखील दिसले तरी लोक ते उचलतात. मात्र सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी कोरोनाचा एवढा धसका घेतला आहे की, रस्त्यावर पडलेल्या नोटा देखील उचलायला घाबरत आहेत. झारखंडच्या रामगड जिल्ह्यात असाच प्रकार पहायला मिळाला. त्यामुळे कोरोना व्हायरसने लोकांना प्रामाणीकपणा शिकवला असेच म्हणावे लागेल.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊननंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्यासाठी नोटांना थुंकी लावताना दाखवण्यात आले. यानंतर रस्त्यावर नोटा पडल्याच्या घटना समोर येत आहे. झारखंडच्या रामगड जिल्ह्यात लॉकडाऊनदरम्यान पाचव्यांदा नोटा रस्त्यावर पडल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी राजधानी दिल्लीत देखील रस्त्यावर पडलेल्या नोटांकडे कानाडोळा केल्याचे पहायला मिळाले होते.

बुधवारी रामगड रांची रोडवर काली मंदिराजवळील रस्त्यावर 500, 50 आणि 10 च्या नोटा पडलेल्या दिसून आल्या. यापूर्वी देखील याच मार्गावर अशा प्रकारे नोटा आढळून आल्या होत्या. या मार्गावर 500 रुपयाच्या दोन नोटा, 50 रुपयाची एक आणि 10 रुपयाच्या तीन चलनी नोटा पडल्याचे आढळून आले. पोलिसांनी या नोटा सॅनिटाइज करून जप्त केल्या आहेत.

दरम्यान, रस्त्यावर नोटा पडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत त्या ठिकाणी गर्दी केली. पोलिसांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. मात्र, नागरिकांनी पोलिसांचे काहीही न ऐकता त्या ठिकाणी गर्दी केली. रामगड जिल्ह्यातील ही पाचवी घटना असल्याने बुधवारी पुन्हा रस्त्यावर नोटा आढळून आल्याने जमलेल्या नागरिकांमध्ये नोटांबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगताना पहायला मिळाल्या.

यापूर्वी रामगड ब्लॉक जवळ, नंतर सुभाष चौक, त्यानंतर भुरकुंडा, रांची रोडवरील दुर्गा माता मंदिराजवळ आणि आता रांची रोडवरील काली माता मंदिराजवळील रोडवर नोटा मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाचव्यांदा अशा प्रकारे नोटा आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, रामगड परिसरात अशा प्रकारे नोटा रस्त्यावर सतत आढळून येत असल्याने कुणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.