Nagpur News : पैशांअभावी उपचार थांबले, मुलाला जगवण्यासाठी आईची 3 महिन्यापासून धडपड

नागपूर : आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार असणारा तीन महिन्यापासून तो बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पडून आहे. डॉक्टरांकडून त्याला जगविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण उपचारात पैशांची मर्यादा आली आहे. जवळची पुंजी, कर्जरूपाने घेतलेले पैसे संपले आहे. मुलाला जगवण्यासाठी आई असून गेल्या काही महिन्यापासून तिच्या तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रूच तरळत आहेत. तिच्या अपेक्षांची ओंजळ भरावी, यासाठी तिला मदतीचा आधार हवा आहे.

२६ ऑक्टोबर रोजी कळमना रोडवर झालेल्या अपघातात तुशाल धनिराम परदेसी हा २५ वर्षीय युवक जखमी झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर सीए रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत त्याचे ४ ऑपरेशन झालेले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर त्याला जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना विश्वास आहे की तुशाल नक्कीच बरा होईल. डॉक्टरांनी दिलेल्या या दिलाशापोटी तुशालचे आईवडीलही वाटेल ती तडजोड करीत आहेत. तुशालचे वडील धनिराम हे हातमजुरीचे काम करतात. आईसुद्धा शिलाई काम करते.

तुशाल हा एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करीत होता. मुलाचा आधार झाल्याने घर सुरळीत सुरू होते. पण २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात तो जीवनमृत्यूशी संघर्ष करत आहे. या संघर्षात आई-वडिलांची जमापुंजी खर्च झाली आहे. नातेवाईक व कर्जरूपाने घेतलेला पैसाही त्याच्या उपचारात संपला आहे. आतापर्यंत तुशालच्या उपचारात १८ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हातचा, कर्जरूपात घेतलेला पैसा आता संपला आहे. आता डॉक्टरांनी परत एक ऑपरेशन सांगितले आहे. तुशाल चालत घरी जाईल, असा विश्वास आईला दिला आहे. आई शोभा त्याच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी भटकंती करीत आहे. कुठेतरी आशेचा दीप पेटेल, मुलगा बरा होईल, असा विश्वास तिला आहे. मुलाला जगविण्यासाठी आईची ही धडपड, तिच्या डोळ्यातून अहोरात्र पडणारे अश्रू पुसायला समाजातील सहहृदयींनी पुढे येण्याची गरज आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून आई शोभाच्या तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रूच तरळत आहेत. तिच्या अपेक्षांची ओंजळ भरावी, यासाठी तिला मदतीचा आधार हवा आहे. हा आधार बनण्याची इच्छा असलेल्यांनी ८९९९२४५१९३ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेतील ३३४३३६४३३६६ या खात्यातसुद्धा मदत करता येईल.