खुशखबर ! शनिवारी मान्सून अंदमानात तर 11 जून पर्यंत मुंबईत धडकणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. मात्र, निसर्गचक्र अव्याहत सुरु असते. लॉकडाऊनसह उन्हाचा चटका सोसणाऱ्या नागरिकांसाठी मोसमी पावसाची आणखी एक सुखवार्ता आली आहे. यंदाच्या वर्षी मोसमी पाऊस सरासरी इतकाच पडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त झाला आहे. परंतु, आता तो कधी येणार याचे देखील संकेत मिळाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे तो १६ मे पर्यंत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे.

देशात दक्षिणेकडून म्हणजे केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळात जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरित भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलत. दरवर्षी २० मे रोजी अंदमानात धडकणार मान्सून यंदा १६ मे पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभाग आणि स्कायमेटने वर्तविला आहे.

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, मुंबईमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होईल. ११ जून पर्यंत मान्सून मुंबईत धडक देऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रास, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये मान्सून ३ ते ७ दिवस लवकर किंवा उशिरानं येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उत्तर आणि पश्चिम भारतात १५ जुलै ऐवजी ८ जुलैला मान्सून दाखल होईल. तसंच राजधानी दिल्लीत यंदा २३ जून ऐवजी २७ जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा ८ ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा कालावधी असणार आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. १५ मे पर्यंत राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम आहे. १३ ते १५ मे या कालावधी मध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह व मध्य महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.