मान्सून अंदमानात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मान्सूनची आतूरतेने वाट पाहणाऱ्या राज्यासह देशासाठी एक आनंदाची आणि उत्साह निर्माण करणारी बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून आज अंदमानात दाखल झाला असून वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग मान्सूनने व्यापला आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही मान्सनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण निर्माण होते आहे. दरम्यान येत्या २४ तासात अंदमान सूमूद्र, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मान्सून दाखल होईल.

गेल्या वर्षी मान्सून २५ मे रोजी अंदमानात दाखल झाला होता. सर्वसाधारण वेळेपेक्षा दोन दिवस आधीच २९ मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. परंतु यंदा साधारणत: १ जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून यंदा केरळात उशीरा हजेरी लावणार आहे. मान्सून ६ जून पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. असा अंदाज आहे.

गेल्या वर्षी २ दिवस आधी केरळात दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात ८ जूनला तळकोकणात हजेरी लावली होती. मात्र यंदा केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची पुढची वाटचाल निश्चित होईल.