दिलासादायक ! मान्सून 1 जूनलाच केरळात दाखल होणार

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोनाच्या संकटात असताना बळीराजासाठी मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा देशात आणि राज्यात मान्सूनचे वेळेत आगमन होणार असून समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत तळ कोकणामध्ये आणि मुंबईत पावसाचे आगमन होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान मान्सून उर्वरित महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

एकीकडे मान्सून वेळेत दाखल होत असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आगामी काही दिवसांत संकट ओढावण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 5 दिवस बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच विजेच्या कडकडाटासह मध्य स्वरूपाचा पाऊसही होण्याची शक्यता नागपूर वेध शाळेने वर्तवली आहे. तर 6 ते 10 मे दरम्यान नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांत चांगला पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.