पावसाचा हाहाकार ! 8 राज्यांत आतापर्यंत तब्बल 470 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत १२ लाखांच्या जवळपास लोकांना याची बाधा झाली आहे. अशातच देशातील आठ राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पूर आणि भूस्खलनमुळे आतापर्यंत ४७० हुन अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या राज्यांना बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, लाखो लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. अनेक जिल्ह्यांत जमीन पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे १११ आणि गुजरातमध्ये ८१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रात ४६ तर मध्यप्रदेशमध्ये ४४ लोकांना पावसामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

आसामला पुराचा मोठा फटका बसला आहे. आसाममध्ये ३३ जिल्ह्यांपैकी २४ जिल्ह्यातील २५ लाखांहून अधिक लोकांचे पुरामुळे मोठे नुकसान झालं आहे. पुरात अडकलेले गोलपाडामधील सर्वाधिक ४.५३ लाख लोक आहेत. बारपेटामध्ये ३.४४ लाख लोक आणि मोरीगावातील ३.४१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा सर्वाधिक फटका बसल्याची माहिती मिळाली आहे. काझीरंगा अभयारण्यातील १०८ प्राण्यांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व मदतकार्य करणारं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या ७० हुन अधिक टीम युद्धपातळीवर कार्यरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयाची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल म्हणाले. ट्विट करत त्यांनी म्हटलं की, ‘पंतप्रधान मोदींनी आसामधील पूरस्थिती, कोरोना संसर्गाचे संकट आणि बघजन तेलविहरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरुन घेतली. बोलताना पंतप्रधानांनी चिंता व्यक्त करत, या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं, असं सोनोवाल यांनी सांगितलं.