Monsoon in Maharashtra : महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून एक्सप्रेसची ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ आता पूर्णत: शमले आहे. आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार बेट, अंदमानच्या समुद्राचा दक्षिण भाग आणि अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागात शनिवारी (दि २१) दाखल झाला आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास सुरु झाला असून हवामानाने साथ दिली तरी मान्सूनचा प्रवास असाच वेगवान राहिल्यास केरळात १ जून तर १० जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे डेरे दाखल होईल असे हवामान विभागाने म्हंटले आहे.

तौक्ते चक्रीवादळ गेले असले तरी त्याचा परिणाम अजूनही काही ठिकाणी जाणवत आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या किंचित सरी कोसळत आहेत. शुक्रवारी मुंबईत बऱ्यापैकी स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात, दक्षिण पूर्व भागात, अंदमानचा संपूर्ण समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढील ४८ तासांत मान्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.