प्रतिक्षा संपली ! ‘या’ तारखेला केरळात दाखल होणार मान्सून

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहे. देशात मान्सून कधी दाखल होईल याची सर्वजण वाट पाहत होते. त्या सर्वांसाठी खुशखबर आली असून, मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे.

दक्षिण पूर्व आणि मध्य अरबी समुद्रामध्ये ३१ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्यामुळे, मान्सून ठरलेल्या वेळेला एक जून पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजे केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल नाही झाला तर उर्वरित भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलत.

अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागरचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहचला आहे. पुढील ४८ तासांमध्ये मालदीवच्या आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार तयार झाला आहे.

दरम्यान, वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमधील मच्छिमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहचण्यास सांगितलं आहे. ज्यांना शक्य नाही. त्यांनी जवळचा किनारा गाठण्यास सांगण्यात आलं आहे. हवामान विभागातर्फे यापूर्वी सहा जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल असं म्हटलं होत. मात्र, आता तो १ जून रोजी दाखल होईल असं सांगण्यात आलंय.