मान्सून परतला, रात्रीच्या तापमानात घट !

पुणे – राज्यातून नैऋत्य मोसमी मान्सूनच्या परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि २८ ऑक्टोबरपासून देशभरातूनच पावसाचा हा प्रवास पूर्ण झालेला असेल. मान्सून जसा परतू लागला आहे तसे पुणे आणि आसपासच्या परिसरात रात्रीच्या तापमानात घट होऊ लागली आहे. दिवसाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर रात्रीचे २१ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली असते. ही घट नोव्हेंबरच्या सुरुवातीला झपाट्याने होईल आणि १८ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली येईल. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी जाणवू लागेल असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

पुणे शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस हवामान कोरडे रहाणार असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा जाणवेल. येत्या दोन दिवसात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्यात विरळ धुके पसरेल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणेकरांना थंडीची चाहूल अनुभवता येईल. दिवाळीमध्ये पहाटे तापमान घटलेलेच राहील.

पाऊस परत गेल्याने पहाटे फिरायला जाणाऱ्यांना सुखद हवेचा अनुभव मिळत आहे. पण, साथीचा संसर्ग अजून टळलेला नसल्याने प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

You might also like