येत्या ४८ तासात मान्सून केरळमध्ये धडकणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाणे वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरातून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून जोराने पुढे सरकतो आहे. वाऱ्याची हीच स्थिती कायम राहिली तर केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर मुसळधार पाऊस येऊ शकतो. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच गोव्यामध्ये 12 जूनला मान्सून धडक देणार असून आंध्र प्रदेशच्या काही भागात तर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवातही झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा सहा दिवसांनी मान्सून उशिरा येणार आहे.
पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

तस पाहिलं तर १ जूनच्या आसपास केरळमध्ये पाऊस सुरू होतो. परंतु यावेळी मात्र दक्षिणेकडच्या या पावसाच्या राज्यात मान्सूनची चिन्हं काही दिसत नाहीत. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून उन्हाचा पारा अजूनही कमी झालेला दिसत नाही. दुष्काळामुळे पाणीसाठा आटल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे सर्वांनाच पासवसाची प्रतीक्षा लागली आहे.

नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनचं आगमन होणार असल्यामुळे देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेतून काहिसा दिलासा मिळेल. उत्तर भारतातल्या राज्यांमध्येही आता उन्हाच्या झळा काहिशा कमी झाल्या आहेत. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्याच नाहीत. त्यामुळे हा काळही पूर्णपणे शुष्क गेला. गेल्या 65 वर्षांत पहिल्यांदा मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण यावेळी अत्यल्प होतं.