Latur News : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन –   भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नांदगावपाटी (ता. चाकूर) येथे सोमवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता ही घटना घडली.

गोविंद निवृत्ती भदाडे (वय 38 रा. लातूर रोड ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. चाकूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद भदाडे हा मोपेडवरुन ( एम.एच.14 जे.के. 1247) चाकूरकडे येत होता. त्यावेळी नांदेडहून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारने नांदगावपाटीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे सहायक पोलिस उपनिरिक्षक हरिदास उळागड्डे, पोलिस कर्मचारी दत्तात्रय गिरी, नितिन चव्हाण, राहूल गव्हाणे घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. चाकूर पोलिसही घटनास्थळी धाव घेत उत्तरीय तपासणीसाठी गोविंद भदाडे याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे पाठवला. दरम्यान गोविंद हा पुण्यात एका खाजगी कंपनीत कामाला होता. तो पुण्याहून मोपेडवरुन गावाकडे येत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.