7 जणांची कुर्‍हाडीनं घाव घालून हत्या करणार्‍या शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली, जाणून घ्या कारण

अमरोहा : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये बावनखेडी हत्याकांडातील दोषी शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. अमरोहामध्ये जनपद न्यायालयाने फिर्यादीकडून मारेकरी शबनमचा तपशील मागवला होता. परंतु, शबनमच्या वकीलाकडून राज्यपालांकडे दया याचिका दाखल करण्यात आली. पुन्हा दया याचिका दाखल झाल्याने फाशीची तारीख निश्चित होऊ शकली नाही.

शबनमच्या फाशीबाबत मंगळवारी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी झाली. असे मानले जात होते की, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात शबनमचा रिपोर्ट सोपवला जाईल आणि जर या रिपोर्टमध्ये कोणतीही याचिका प्रलंबित आढळली नाही तर शबनमच्या फाशीची तारीख ठरवली जाऊ शकते. परंतु, शबनमच्या वकीलांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा दया याचिकेसाठी राज्यपालांकडे विनंती करत जिल्हा जेल रामपुर प्रशासनाला प्रार्थनापत्र सोपवले होते. आज सुनावणीत याचाच उल्लेख आला, ज्यामुळे फाशीची तारीख निश्चित होऊ शकली नाही.

अशी आहे केस
14 /15 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत मिळून आपल्याच कुटुंबातील 7 लोकांची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या केली होती. या प्रकरणी खालच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वांनी दोघांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. डिसेंबर 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने तिची पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळली होती. यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा शबनमची दया याचिका फेटाळली. मात्र, नैनी जेलमध्ये बंद असलेल्या सलीमच्या दया याचिकेवर अजून निर्णय व्हायचा आहे.

सीबीआय चौकशीची मागणी
मागील आठवड्यात आपल्या 12 वर्षाच्या मुलाला भेटल्यानंतर शबनम खुप रडली आणि निर्दोष असल्याचे म्हणत सीबीआय तपासाची मागणी केली. शबनमचा मुलगा ताजचा सांभाळ करत असलेले पत्रकार उस्मानी सैफी यांनी सांगितले की, रामपुर जेलमध्ये जेव्हा त्यांनी शबनमला विचारले की, तू हा गुन्हा केला आहेस का, तेव्हा तिने नकार दिला आणि सीबीआय तपासाची मागणी केली. शबनमने मुलगा ताजला सांगितले की, त्याने तिच्या सावलीपासून सुद्धा दूर राहावे आणि शिक्षण घेऊन चांगला माणूस व्हावे.