भारतात बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली; 12 हजाराहून अधिक संख्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – केंद्रीय पर्यायवरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘भारतातील बिबट्यांची स्थिती २०१८’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार भारतात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असून देशात किमान १२,८५२ बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. २०१४ मध्ये झालेल्या गणनेनुसार देशात सुमारे ८००० बिबटे असल्याची नाेंद झाली हाेती. चार वर्षांमध्ये तब्बल ४८०० हून अधिक बिबटे वाढले आहेत. सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशमध्ये असून त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागताे.

गेल्या काही वर्षांमध्ये वाघ, सिंह आणि बिबट्यांची संख्या वाढली आहे. हे आकडे भारतातील उदात्त वन्यजीवसंपदा आणि जैवविविधतेची साक्ष देत असल्याची प्रतिक्रिया जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बिबट्यांची सुमारे ५१ हजार छायाचित्रे काढण्यात आली हाेती. शरीरावरील ठिपक्यांच्या पॅटर्नवरून केलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

यावर्षीच्या सुरुवातीला केलेल्या एका अभ्यासामध्ये पश्चिम घाट, दख्खनचे पठार, शिवालीक पर्वत आणि उत्तर भारतातील तेराई प्रांतातील बिबट्यांच्या प्रजातींमध्ये उच्च अनुवांशिक भिन्नता आढळली हाेती. देशात १२ ते १४ हजार बिबटे असल्याचा अंदाज २०१६ मध्ये व्यक्त करण्यात आला हाेता. प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात वाघांचा संचार असलेल्या राज्यांमध्येच बिबट्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील एकूण बिबट्यांची संख्या १२,८५२ हून बरीच जास्त असू शकते, असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात मृत्यू वाढले
महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली असली तरी त्यांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. यावर्षी त्यात ५७ टक्के वाढ झाली आहे. राज्यात नाेव्हेंबरपर्यंत १७३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ७० मृत्यू नाशिक जिल्ह्यात, तर पुणे आणि काेल्हापुरात प्रत्येक २६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६४ मृत्यू हे अपघाती असून १७ बिबट्यांची शिकार झाली आहे.