…तर राज्यात कोरोनामुळे झालेले 30 हजारांहून अधिक मृत्यू टळले असते : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहे. सातत्याने कमी चाचण्या केल्याने राज्यात कोरोना वाढला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर 9 लाख 55 हजार रुग्ण कमी राहिले असते. तसेच 30 हजार 900 हून मृत्यू कमी झाले असते. आता ही जबाबदारी कुणाची? केंद्र सरकारचा आर्थिक पाहणीचा अहवाल अतिशय बोलका आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरच्या माध्यमातून राज्यात जम्बो भ्रष्टाचार झाला. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय याचा अर्थ या सरकारने समजावून सांगितला असेही ते म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 2) विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाकाळातील परिस्थितीवरून सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 9 टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. पण देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी 33 टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या राज्यात 46 हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत दिली.