PM मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ नाऱ्यानंतर, देशात स्टार्टपची नोंदणी तेजीत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या नाऱ्यानंतर देशभरातील अनेकांनी कोरोनाचे आव्हान संधीत बदलले दिसत आहे. कोरोना संकटामुळे जागतिक स्तवरावरील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले असताना भारतातील स्टार्टअप कंपन्या (Startup companies)
मात्र तेजीत असल्याचे दिसून येत आहे. उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या एका आकडेवारीनुसार, देशात डिसेंबर महिन्यापर्यंत 41 हजार 190 स्टार्टअप सुरू झाले आहेत. भारताने आता जागतिक स्तरावरील ‘स्टार्टअप इकोसिस्टम्स’च्या (Startup Ecosystems) क्रमवारित तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये सुरु होणा-या स्टार्टअपची संख्या 29 हजार 17 होती. मार्च महिन्यात कोरोनाने जगभरात थैमान घातले. त्यानंतर भारतासह जवळपास संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या नाऱ्यानंतर अनेकांनी कोरोनाचे आव्हान संधीत बदलले आहे. आता स्टार्टअपची संख्या 41 हजार 190 गेली आहे. सन 2019 पेक्षा 50 टक्के अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेतील जाणकार, तज्ज्ञांच्या मतानुसार, देशाच्या विकासातील दशा आणि दिशा यांमध्ये महत्त्वाची भूमिका स्टार्टअप बजावतील. यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्टार्टअप सुरू करण्यासाठी अनेक सुविधा, सवलती दिल्यामुळे अनेक जण पुढे सरसावले, असे म्हटले जात आहे.

‘या’ क्षेत्रात वाढले स्टार्टअप
गेल्या काही महिन्यात ई-कॉमर्स, आरोग्य आणि त्यासंबंधी निगडीत विभाग, कृषि, शिक्षण, फिनटेक, डिजिटल टेक्नॉलॉजी, ऊर्जा, वित्त, अंतर्गत सुरक्षा, अंतराळ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन स्टार्टअपची नोंदणी केल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय पर्यटन आणि शहरी सेवा, प्राचीन भारतीय जीवन पद्धती यांसारख्या अन्य काही क्षेत्रातही स्टार्टअप सुरू झाल्याचे समजते.