Nagpur News : बर्ड फ्लूचा धोका ? नागपूर जिल्ह्यात 500 हून अधिक पक्षांचा मृत्यू

नागपूर (कोंढाळी) : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आदी पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा ( bird flu )कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’चा धोका नसल्याचे राजाचा पशुसंवर्धन विभाग सांगत असला तरी नागपूर जिल्ह्यात 500 हुन अधिक पक्षांचा मृत्यू झाला आहे. पक्षांचा हा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला हे अद्याप जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट झाले नाही.

मात्र परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे स्थानिक पशुपालकात भितीचे वातावरण पसरले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी भागातील रिंगणाबोडी, माणिकवाडा, मसाळा, शिवा, आकेवाडा आदी भागात 500 हून अधिक चिमन्या, पोपट, कावळे आदी पक्षांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात रिंगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपूरे यांनी कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना माहिती दिली.

काटोल तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड  व सुधीर कापसीकर विविध गावांना भेट देवून या प्रकाराची माहिती घेत आहे. पक्षांचा हा मृत्यू कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट करण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक अधिका-यांनी सांगितले आहे.