Pune News : दिलासादायक ! 1.75 लाखांहून अधिक पुणेकरांची ‘कोरोना’वर मात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरासह जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार २९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी तीन लाख ७४ हजार ५६० कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी सध्या विविध रुग्णालयात १ हजार ७८२ जण उपचार घेत असून ३ हजार ३६ जणांचे आपापल्या घरातच विलगीकरण (होम आयसोलेशन) करण्यात आले आहे. गेल्या ११ महिन्यांच्या कालखंडात पावणेदोन तब्बल १ लाख ८६ हजार ५३६ पुणेकरांनी कोरोनावर मात केली आहे. पावणेदोन लाख पुणेकरांसह जिल्ह्यातील पावणेचार लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, आजतागायत ८ हजार ६५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ९४५ जणांचा समावेश आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२०२ ला पुणे शहरात सापडला होता. पहिल्या तीन महिन्यात काही शेकड्यांमध्ये असलेले रुग्णांचे प्रमाण जूननंतर हजारांत आणि ऑगस्ट महिन्यात लाखांवर पोहोचले होते. त्यानंतर आक्टोबर महिन्याच्या अखेरीस दररोजच्या नवीन रुग्णवाढीचे प्रमाण वेगाने कमी होण्यास सुरवात झाली. सध्या एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा हजारांमध्ये आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख ३६ हजार ९७२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १० लाख ४४ हजार ४२२ चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील ६ लाख २४ हजार ६६३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन लाख ५४ हजार ८११, नगरपालिका क्षेत्रातील ८९ हजार ८०
आणि कॅंन्टोंमेंट बोर्डातील २३ हजार ९९६ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात
आल्या आहेत.

कोरोनामुक्त रुग्ण ( कार्यक्षेत्र)

– पुणे शहर – १ लाख ८६ हजार ५३६

– पिंपरी चिंचवड – ९६ हजार ८७७

– जिल्हा परिषद कार्यक्षेत्र – ६५ हजार ५४८

– नगरपालिका (१४) कार्यक्षेत्र – १८ हजार ८५५

– कॅंटोन्मेंट बोर्ड (०३) – ६ हजार ७४४