Coronavirus : नवीन वर्षाचं स्वागत ‘कोरोना’विरूध्दच्या लसीनं होण्याची आशा, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर गेली आहे. तद्वतच रुग्णसंख्या वाढतच असून, कोरोनावर प्रभावी लस केव्हा येईल, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. त्यावरती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भाष्य करत कोरोना लस कधी मिळणार याबाबतची माहिती सांगितली आहे.

मंत्रिगटाच्या २१ व्या बैठकीत बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘नववर्षाच्या सुरुवातीस आम्हाला एकापेक्षा अधिक कोरोना लसी मिळतील, अशी अपेक्षा आहे. आमचे तज्ज्ञ देशभरात कोरोना लस कशी वितरित करायची यासंदर्भात प्लॅनिंग करत आहेत, असे त्यांनी सांगितले.’ यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, हरदीप सिंह पुरी आदी मंत्री उपस्थित होते.

यापूर्वी रविवारी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होत की, भारतासारखी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात लसीचे वितरण करण्याची प्राथमिकता अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. त्यात देशातील कोरोना संसर्गाचा प्रसार, नागरिकांमध्ये इतर रोगांचा प्रसार, कोरोनाचा मृत्यूदर आदी बाबी पाहिल्या जातील. आम्हाला शेवटच्या नागरिकापर्यंत कोरोना लस कशी पोहचेल याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होते.

देशातील रुग्णसंख्या ७२ लाखांच्या आसपास

मंगळवारी देशात ५५ हजार ३४२ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर गेली आहे. तर गेल्या २४ तासात ७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. आजवर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण बरे झाले असून, भारताचा रिकव्हरी रेट ८५ टक्के झाला आहे. सध्या ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.