दुचाकीचे बनावट इन्शुरन्स विकणारी टोळी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकी वाहनाचा विमा संपल्याचे सागून वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांची पॉलिसी काढून दुचाकी स्वारांची फसवणूक करणाऱ्या तिन जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी हे वाहन चालकाकडून मिळालेली रक्कम स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेत होते.

गजानन केदारी पाटील (२८), प्रशांत भरमू सुतार (२५) आणि इनायत अब्दुल गणी बेद्रेकर (३१) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट- ३ च्या पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. तीनजण वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी काढून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट इन्शुरन्स पॉलिसी देऊन ती खरी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी ओपीएस या कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयावर छापा टाकून तिघा अधिकाऱ्यांना कॉम्प्युटर, कागदपत्रे आदी साहित्यासह अटक केली.

अधिक तपासात ओपीएस (वन पॉइण्ट सोल्युशन) जनरल इन्शुरन्स या कंपनीचे अधिकारी बेळगाव, कर्नाटक येथे कार्यालय उघडून तेथून इन्शुरन्स कंपन्यांच्या ग्राहकांची माहिती गोळा करीत होते. त्यानंतर ज्या ग्राहकांच्या पॉलिसीची मुदत संपत आहे त्यांना फोन करून त्यांच्या नावाच्या बनावट पॉलिसी बनवत असत. अशा प्रकारे यातील आरोपींनी एक हजार लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.