‘कोरोना’चा उद्रेक ! पुण्यात एकाच दिवसात 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, समुह संसर्गाला सुरुवात?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे जिल्हा मोठा हॉटस्पॉट ठरला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. शनिवारी कोरोना रुग्णसंख्येने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

पुणे जिल्ह्यात शनिवारी 10 हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरुन गेले. शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजार 827 नवे रुग्ण आढळून आले. तर फक्त पुणे शहरात 5 हजार 720 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 हजार 832 तर ग्रामीण भागात पहिल्यांदाच दीड हजारांवर रुग्णसंख्या आढळून आली.

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. शनिवारी पुणे जिल्ह्यामध्ये 66 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कोरोना समुह संसर्गाला सुरुवात तर झाला नाही ना ? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पुण्यामध्ये दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींचा लॉकडाऊनला विरोध
पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असताना लॉकडाऊनवरुन लोकप्रतिनिधी चिखलफेक करण्यात व्यस्त असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाची साखळी तुटणार कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात बेड मिळणे अवघड झाले आहे. रुग्णांची बेडसाठी पळापळ सुरु झाली आहे.