उद्या नगर लोकसभा मतदारसंघात ‘देश का महात्योहार’

१८ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या, मंगळवारी (दि. २३) मतदान होणार असून, मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ ही मतदानाची वेळ असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील २०३० मतदान केंद्रावर १८ लाख ५४ हजार २४८ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. यात ९ लाख ७० हजार ६३१ पुरुष व ८ लाख ८३ हजार ५२९ महिला मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीत १८ लाख ५४ हजार २४८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०३० मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी ४२६३ बॅलेट युनिट, २४३६ कंट्रोल युनिट व २६३९ व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. द्विवेदी यांच्यासह मुख्य निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन, पोलीस विभागासाठीच्या निवडणूक निरीक्षक भवानीश्वरी यांनीही मतदान साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वाटप करण्यात आलेले साहित्य आणि मतदान यंत्रे घेऊन पुरेशा बंदोबस्तात संबंधित पथकांना मतदानकेंद्रांवर रवाना करण्यात आले.

मतदान साहित्यासह अधिकारी कर्मचारी रवाना
मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) सोमवारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदारांनी मुक्त व निर्भयपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.