२० हजारांपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास भरावा लागणार दंड 

दिल्ली : वृत्तसंस्था – काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीनंतर काळ्या पैशांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न केले गेले. दरम्यान मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला होता आणि यानंतर देशभरात लोकांनी त्याचा स्वीकार करत डिजिटल व्यवहाराला चालना दिली होती. दरम्यान आता रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्ही जर आता रोखीने व्यवहार करणार असाल तर तुम्हाला कदाचित दंड भरावा लागेल. कारण याबाबत आयकर विभागाने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे.

जे लोक २० हजारापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करतील त्यांना तेवढ्याच रकमेचा दंड भरावा लागणार आहे असा निर्णय आयकर विभागाने नुकताच जाहीर केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर या  कायद्यांतर्गत अशा लोकांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रोख व्यवहार करताना इथून पुढे सावध रहावे लागणार आहे असे दिसत आहे.

मुख्य म्हणजे आता  हे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे. २० हजारापेक्षा अधिक रक्कम रोख मोजून यापुढे कर्ज फेडणे, कोणाला आगाऊ रक्कम देणे, डिपॉझीट ठेवणे यासारखे व्यवहारही करता येणार नाहीत. मात्र आई वडील, बहिण भाऊ, नवरा बायको अशा कौटुंबिक नात्यात रोख रकमेचे हे बंधन लागू होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी यासाठी सरकारने अनेक सकारात्मक पाऊले उचलली आहेत. इतकेच नाही तर  देशात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी काही ठोस पाऊलेही उचलली. मात्र तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार होत आहेत. यावर बंधने यावीत यासाठी आयकर विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून त्यानुसार नियम अधिक कडक केले आहेत.