Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’चा हाहाकार सुरूच, 24 तासात 2470 रुग्णांचा मृत्यु, बधितांची आकडा 10 लाखावर

वॉशिंग्टन : वृत्त संस्था  – अमेरिकेत अजूनही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याच्याबरोबरच मृत्युचे तांडव अजूनही सुरुच आहे. गेल्या २४ तासात तब्बल २ हजार ४७० जणांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेत गेल्या चार दिवस मृत्यु पावलेल्यांची संख्या दोन हजारांहून कमी झाली होती. मात्र, मंगळवारी त्यात पुन्हा वाढ झाली.

यापूर्वी २१ एप्रिल रोजी सर्वाधिक २ हजार ६८३ जणांचा मृत्यु झाला होता. १५ एप्रिल रोजी एकाच दिवसात २ हजार ६३१ आणि १७ एप्रिल रोजी २ हजार ५४३ जणांचा मृत्यु झाला होता. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाग्रस्त ५९ हजार २६६ जणांचा मृत्यु झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १० लाख ३५ हजार ७६५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यात न्यूयॉर्कमध्ये ३ लाख १ हजार ४५० रुग्ण आहेत. न्यूजर्सीमध्ये १ लाख १३ हजार ८५६ रुग्ण आहेत.

अमेरिकेत गेल्या २४ तासात २५ हजार ४०९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २४ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल ३८ हजार ९५८ नवीन कोरोना बाधित आढळून आले होते. त्याचबरोबर आतापर्यत १ लाख ४२ हजार २३८ जण कोरोनातून बरे झाले आहेत.