मुंबईतील ‘कोरोना’ मृतांमध्ये 50 वर्षांवरील 77 % रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईतील कोरोना मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये 50 वर्षांवरील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 19 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृतांपैकी 77 टक्के रुग्ण हे 50 वर्षांवरील होते. कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा दर कमी झालेला असला तरी गेल्या काही दिवसांत मृतांचा आकडा वाढलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चपासूनच्या विविध मृत्यू प्रकरणांची पडताळणी करून त्यांची संख्या मृतांच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आली आहे.

विविध रुग्णालयांतून मार्चपासून झालेल्या 862 मृत्यंची संख्या एकूण मृतांच्या आकडयात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच मृतांची आकडेवारी एखाद्या रुग्णालयाकडे प्रलंबित असल्यास त्याची माहिती ताबडतोब देण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्यामुळे गेल्या काही दिवसांत मृत्यूंची संख्या झपाटयाने वाढली आहे. मृत्यूचा दर 5.2 च्या पुढे गेला आहे. 19 जूनपर्यंत 3 हजार 423 करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 हजार 651 मृतांचे वय 50 पेक्षा जास्त आहे.

महापालिकेचे आतापर्यंत सुमारे दोन हजार कर्मचारी बाधित झाले असून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. पालिकेने 55 वर्षांवरील कर्मचार्‍यांनाच सूट दिली आहे. मात्र मृत पावलेल्या कर्मचार्‍यांमध्ये 50 वर्षांवरील कर्मचार्‍यांचाच समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामामध्ये राज्य आणि केंद्र सरकारप्रमाणे 50 वर्षांवरील कर्मचार्‍यांना वगळण्यात यावे, अशी मागणी पालिका इंजिनीअर असोसिएशनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. तसेच ज्या कामगारांना काही दीर्घकालीन आजार असतील त्यांची रजा मंजूर करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.